Ad will apear here
Next
‘जागतिक रॅली सीरिज’साठी संजय सज्ज...
संजय टकलेकार रेसिंग, मोटर अॅडव्हेंचर रेसिंग आणि मोटोक्रॉस या थरारक क्रीडा प्रकारात भारताच्या कोणा खेळाडूने देशात वा परदेशात नाव उंचावले... अशी घटना विरळच. परंतु गेल्या काही काळात ही परिस्थिती एका माणसामुळे बदलली आहे. संजय टकले असे या अवलिया रॅली ड्रायव्हरचे नाव.... ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख रॅली ड्रायव्हर संजय टकले यांच्याबद्दल...
.....................................
चौदा वर्षांचा मोटोक्रॉस आणि कार रेसिंगचा अनुभव असलेले संजय टकले आता सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जागतिक रॅली सीरिज स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. फिनलंडला होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणारे संजय टकले एकमेव भारतीय रॅली ड्रायव्हर आहेत. डब्ल्यूआरसी-३ या विभागात ते सहभागी होणार असून इंग्लंडचे ‘डॅरेन गेरॉड’ हे त्यांचे नेव्हिगेटर असणार आहेत. या स्पर्धेला सर्वाधिक थरारक स्पर्धा समजण्यात येते. कारण भयानक जम्प, धोकादायक वळणे, अत्यंत खडतर ट्रॅक असा प्रवास असतो. कित्येक नावाजलेले स्पर्धक इथे सातत्याने अपयशी ठरले आहेत; मात्र संजय टकलेंचा अनुभव आणि आजवर त्यांनी अशा प्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये दाखवलेले वर्चस्व त्यांना याही स्पर्धेत यशस्वी करेल असा विश्वास वाटतो.

ही रॅली केवळ पूर्ण करणेही अनेक खेळाडूंना जमत नाही तिथे संजय टकले मात्र ही रॅली जिंकण्यास सज्ज आहेत. शिवाय रॅली पूर्ण करण्याबरोबर या ट्रॅकवर मिळणारा अनुभव आगामी मोसमातील विविध स्पर्धेत उपयुक्त ठरणार आहे. भारताचे नोंदणीकृत रॅली ड्रायव्हर म्हणून त्यांचा अनुभव मोठा आहे.  भारतातील जवळपास प्रत्येक स्पर्धेत ते सहभागी होतात आणि यशही मिळवतात. जागतिक स्तरावर आज त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे फिनलंडमधील रॅली त्यांनी केवळ पूर्ण जरी केली, तरी त्यांची ही कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जाणार आहे. अर्थात भारताचेही नाव उंचावणार यात शंका नाही आणि त्यांच्या प्रेरणेतून भविष्यात अनेक खेळाडू तयार होतील.

‘एशिया-पॅसिफिक रॅली विजेतेपद स्पर्धे’त रॅलीदरम्यान उजव्या हाताला दुखापत झालेली असतानाही टकले यांनी आपले लक्ष्य पूर्ण करत क्वीन्सलँड येथील ही स्पर्धा जिंकली होती. ही त्यांची जागतिक स्तरावरची सर्वांत अचंबित करणारी कामगिरी ठरली होती. या स्पर्धेनंतर टकले यांनी मलेशियात झालेल्या ‘ए-६ क्लास एशिया-पॅसिफिक रॅली’च्या चौथ्या फेरीतही यश मिळवले. या स्पर्धेतील त्यांचे ‘ए-६ क्लास’मधील हे पहिलेच विजेतेपद ठरले. ही शर्यत त्यांनी तीन तास ४७ मिनिटे आणि ५८.८ सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण केली. अर्थात ही स्पर्धा जिंकल्यानंतरही त्यांना या मालिकेत झालेल्या काही स्पर्धांमध्ये अपयश आले आणि सर्वसाधारण तिसऱ्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावे लागले.

मलेशियात झालेल्या ‘एशिया पॅसिफिक सीरिज’च्या मलेशियातील पहिल्या फेरीत संजय टकले व त्यांचे सहकारी मुसा शरीफ यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.  संजय टकलेंना ‘प्रोटॉन कॉम्पॅक्ट’ मोटारी जास्त आवडतात. ‘एसयूव्ही’ मोटारींपेक्षा या मोटारी चालवत रेसिंग करण्यात त्यांचा हातखंडा आहे. ‘हिमालयन रॅली’मध्येही त्यांनी याच गाड्या चालवून यश मिळवले होते. मलेशियातील रॅली त्यांना जास्त आव्हानात्मक वाटतात, कारण भारतापेक्षा खडतर ट्रॅक, घनदाट जंगलातून जाणारे आणि अत्यंत उंच-सखल रस्ते, त्यातही चिखलाने भरलेले रस्ते अशा वातावरणात रेस खेळणे अत्यंत आव्हानात्मक असते आणि संजय टकले यांनी आतापर्यंत अशाच आव्हानांचा सामना केला आहे.

हिमालयन रॅलीमध्ये अशाच आव्हानात्मक वातावरणात संजय यांनी विजय मिळवला. या रेसदरम्यान काही क्षण अगदी जीवावर बेतणारे आले होते, परंतु आपल्या अफलातून कौशल्याच्या बळावर त्यांनी यश मिळवले. ब्लॅक आइसचा (चिखलातला बर्फ) अडथळाही त्यांनी पार केला. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच मोटोक्रॉसमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी लग्न केले. आता त्यांना एक मुलगी आहे. 

टकले यांना वाळवंटातील रेसिंगचा दांडगा अनुभव आहे. याचबरोबर हिमालयातील शर्यतींचाही मोठा अनुभव आहे. कोणत्या वातावरणात कशा प्रकारे कार चालवायची, त्यावर नियंत्रण ठेवत वेग कसा वाढवायचा याचाही त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. आता फिनलंड येथील जागतिक स्पर्धेद्वारे ते सर्वांत खडतर अशा शर्यतीत सहभागी होत आहेत. हा अनुभव त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.

टकले यांची कारकीर्द अशाच खडतर शर्यतींनी आणि आव्हानांनी भरलेली आहे; पण त्यामुळेच देशात त्यांचाही एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. आज वयाची चाळिशी पार केलेले टकले यांचा प्रयत्न आहे, तो इतर तरुणांना प्रेरणा देण्याचा व आपले वारसदार निर्माण करण्याचा. आज भारतात अॅडव्हेंचर स्पोर्ट्स लोकप्रिय होत आहेत आणि येत्या काळात टकले यांच्यासारखे अनेक रॅली ड्रायव्हर तयार होतील असा विश्वास वाटतो.

- अमित डोंगरे
ई-मेल: amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZTOBR
Similar Posts
चौसष्ठ घरांचा नवा राजा ग्रँडमास्टर होण्याचे स्वप्न बुद्धिबळातला प्रत्येक खेळाडू पाहतो; मात्र त्यात खूप कमी जण यशस्वी होताना दिसतात. पुण्याचा अभिमन्यू पुराणिक याने आपले हे स्वप्न पूर्ण करून महाराष्ट्राचा सातवा, तर पुण्याचा तिसरा ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवला... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या बुद्धिबळपटू अभिमन्यू पुराणिकबद्दल
उत्कृष्ट फुटबॉलपटू घडवणारा परेश... फुटबॉलमध्ये परेश शिवलकर हे नाव केवळ पुण्यातच नाही, तर राज्य पातळीवरदेखील आता नवीन राहिलेले नाही. एक फुटबॉलपटू म्हणून जितकी अविस्मरणीय कारकीर्द त्याने गाजवली आहे, तेवढाच आज एक प्रशिक्षक म्हणून तो यशस्वी ठरत आहे... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक परेश शिवलकरबद्दल...
वेगाची नवी राणी : ताई बामणे नाशिकची नवोदित धावपटू ताई बामणे हिने युवा ऑलिंपिकला पात्र ठरत भारताची नवी वेगाची राणी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अर्जेंटिनामध्ये होणाऱ्या युवा ऑलिंपिक स्पर्धेसाठी ती पात्र ठरली असून बँकॉक येथे झालेल्या पात्रता फेरीत तिने पंधराशे मीटर अंतराच्या शर्यतीत रौप्य पदक पटकावले आणि युवा ऑलिंपिकची पात्रता मिळवली
वयावर मात करत खेळणारा नितीन टेनिसमधील इंडियन एक्स्प्रेस म्हणून ओळखले जाणारे लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्याच काळात आणखी एक खेळाडू भारतात नावारूपाला आला, तो म्हणजे नितीन कीर्तने. प्रशिक्षक म्हणून काम करत असताना वयावर मात करत नितीन एक खेळाडू म्हणूनही सातत्याने विविध स्पर्धेत यशस्वी होत आहे.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या टेनिसपटू-प्रशिक्षक ‘नितीन कीर्तने’बद्दल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language